पेर फळाची प्राथमिक माहिती
ह्या स्थानिक नावाने भारतात विकली जाणारी खाद्य फळे थोडीफार सर्वांना परिचित आहेत, पण भारतात त्यांना फारसे महत्त्व नाही आणि अल्प प्रमाणातच ती काही ठिकाणी पिकविली जातात. ज्या झाडांपासून ती मिळतात त्यांचा अंतर्भाव फुलझाडांपैकी ⇨रोझेसी कुलातील (गुलाब कुलातील) पायरस या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या वंशात करतात. ह्या वंशात एकूण वीस जाती असून भारताबाहेरील देशांत त्यांची फळे ‘पेअर’ या नावाने ओळखतात. ती तेथे अत्यंत लोकप्रिय असून त्यांच्याच वंशातील ⇨सफरचंदाखालोखाल त्यांचा क्रमांक आहे. गुलाब कुलातील (व प्रूनस वंशातील) पीच (सप्ताळू), प्लम (अलुबुखार) व चेरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय फळांपेक्षा पेअरचे उत्पादन बरेच अधिक आहे. सर्व पेअरची झाडे मूळची युरोप ते पूर्वेकडे आशियातून चीन व उ. आफ्रिका या प्रादेशिक पट्ट्यातील आहेत त्यांपैकी कोणतीही जाती मूळची द. गोलार्ध आणि अमेरिकेतील नाही. ज्याला ‘सामान्य पेअर’म्हणतात ती (पायरस कॉम्यूनिस) आग्नेय यूरोप व प. आशिया येथील असून आजचे लुसलुशीत व रसाळ प्रकार तिच्यापासून निघालेले आहेत. ‘पेरी’या मद्ययुक्त पेयाचे उत्पादन तेथील एका भिन्न (पायरस निव्हॅलिस) जातीच्या अनेक प्रकारांतून केले जाते. आशियातील बहुतेक जाती चिनी सँडपेअर (पायरस पायरिफोलिया) पासून निघाल्या आहेत हिच्या फळांतील मगज (गर) चरबरीत आणि रेवाळ असतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर लागवडीत असलेल्या अनेक प्रकारांचा उगम याच जातीतून झालेला आहे. ही आणि इतर पौर्वात्य जाती यांना करपा रोगाची बाधा फारशी होत नाही, असा अनुभव आहे परंतु या संदर्भात सामान्य पेअर ह्या यूरोपीय जातीपासून निघालेले प्रकार अधिक नाजूक असतात, ही गोष्ट महत्त्वाची आहे.

Comments
Post a Comment