पेर चे प्रकार
पेर चे प्रकार : आशियाबाहेरील देशांत ‘विल्यम्स’ (अमेरिकेत ‘बार्टलेट’) प्रकाराची लागवड सर्वाधिक आहे. कॅनडा व संयुक्त संस्थानांत ‘ब्यूरे बॉस्क’, ‘ब्यूरे द अँजौ’आणि ‘विटर नेलिस’यांची लागवड करतात. इंग्लंड व नेदरलंड्समध्ये ‘कॉन्फरन्स’आणि इटलीत विल्यम्सशिवाय ‘क्यूरेटो’, ‘कोसिया’इत्यादींवर भर आहे. फ्रान्स इटलीत ‘पासे क्रासने’हा प्रकार विशेष लागवडीत आहे. १८४९ मध्ये फ्रान्समध्ये ‘डॉयने दू कॉमिस’ह्या अत्युत्तम जातीचे उत्पादन केले गेले. आशियाई देशांत स्थानिक जातींचे प्रकार लावले जातात परंतु ते इतरांहून कमी प्रतीचे मानले आहेत. पेअरची झाडे साधारणपणे लावल्यापासून सु. चार ते सात वर्षांत फळे धरतात आणि त्यांचा आयुःकाल ५०–७५ वर्षे असतो. काळजीपूर्वक खुडणे, आधार देणे इ. प्रक्रिया केल्यास आकार भरमसाट वाढत नाही. –२९°से. ते –३५°से. इतक्या कमी तापमानात ती झाडे जगत नाहीत. मध्यम प्रकारच्या उन्हाळ्यात त्यांचे फलोत्पादन चांगले होते.
भारतात ‘यूरोपीय’ (पायरस कॉम्यूनिस) व ‘पौर्वात्य’ (पायरस पायरिफोलिया) या दोन जातींपासून निघालेल्या प्रकारांची (नाश्पाती) मिळतात. यूरोपीय जातीचे चायना, बार्टलेट, विंटर नेलिस, ओल्ड होम, बगुगोशा इ. प्रकार आहेत पौर्वात्य जातीचे नाख व सँडपेपर हे दोन मुख्य प्रकार आहेत ह्या प्रकारांत काटेकोर फरक नाहीत. काश्मीर, हिमालय प्रदेश, उत्तर प्रदेशचा काही भाग, ईशान्य भारतातील काही भाग, निलगिरी टेकड्या इ. ठिकाणी काही प्रकारांची लागवड केली जाते. बाजारात विकल्या जाणाऱ्या नासपती फळांमध्ये कमीअधिक चांगले प्रकार आढळतात व त्यांचा उगम वर उल्लेख केलेल्या यूरोपीय व पौर्वात्य जातींपासून झालेला आहे पुढे दिलेली वर्णने ह्या जातींना स्थूलमानाने लागू पडतात.

यूरोपीय पेअर : (कॉमन पेअर पा. कॉम्यूनिस). हा रुंद माथ्याचा लहान वृक्ष असून त्याची पाने गोलसर अंडाकृती किंवा लंबगोल व ५–१० सेंमी. असतात त्यांची किनार सूक्ष्म दातेरी असते. गुलुच्छ प्रकारच्या फुलोऱ्यावर [⟶ पुष्पबंध] थोडी, पांढरी व २–२·५ सेंमी. व्यासाची फुले येतात. भिन्न प्रकारांतील पानांत, फुलांत व फळांत फरक असून ते सर्व प्रकार नैसर्गिक किंवा कृत्रिम संकरज आहेत. ह्या जातीतील फळे सु. २ सेंमी. किंवा अधिक, आकाराने बहुधा लांबट व लहान पेरूसारखी, चवीला गोड व मगज कमी रेवाळ असतो. फळावर बहुधा सतत संवर्ताचे अवशेष असतात. बियांची संख्या कमीजास्त असते.
पौर्वात्य पेअर : (सँडपेअर पा. पायरिफोलिया, प्रकार कल्टा पा. सायनेन्सिस). हा सु. ९–१५ मी. उंचीचा वृक्ष असून त्याला सु. १०–१५ X ७–१० सेंमी. व गर्द हिरवी पाने, पांढरी फुले आणि सु. ९ सेंमी. व्यासाची बहुधा गोलसर व सफरचंदासारखी फळे येतात ती कमी प्रतीची व जास्त रेवाळ असतात संवर्ताचे अवशेष आधी गळून पडलेले असतात. निलगिरी भागात ‘बेरीकाई’ हे स्थानिक नाव आहे.
Comments
Post a Comment